सरफराज संदी, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sangali News: सांगलीत एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. घोड्यांच्या बाबतीत एक अघोरी प्रकार घडला आहे. घोड्यांचे खासगी अवयव तारांनी शिवल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्राणीमित्रांनी लगेचच अॅक्शन घेतली आहे. तर पोलिसांनीही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


सांगली शहरात फिरणाऱ्या तीन घोडीचे खासगी अवयव तांब्यांच्या तारांनी शिवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती मिळताच अॅनिमल राहत प्राणी मित्र संघटनेनी या घोडींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार केले आहेत. संघटनेने घोडींच्या अवघड जागेवर मारलेल्या तांब्याच्या तारांचे टाके काढून टाकण्यात आले आहेत. तसंच, या आघोरी प्रकाराबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घेत तक्रार दाखल केली आहे. 


प्राणी मित्र संघटनेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, हे कृत्य का करण्यात आले हेदेखील समोर आले आहे. सदर घोडीचे गर्भधारणा होऊ नये म्हणून असा अघोरी प्रकार करण्यात आल्याचा संशय प्राणिमित्रांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


साल दुपारी आमच्या संस्थेतील एक डॉक्टर उपचारांसाठी त्या परिसरात गेले असताना त्यांना या तीन घोडी दिसल्या. त्यांच्या खासगी अवयवांना तांब्यांच्या तारा दिसून आल्या. तेव्हा तात्काळ आम्ही पोलिसांना संपर्क केला. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा आधीच घोड्यांच्या त्या भागातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळं आम्ही पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांना अॅनेस्थेशीयाचे इंजेक्शन देऊन तांब्याच्या तारा काढल्या आहेत, अशी माहिती डॉ.राकेश चित्तोरा यांनी दिली आहे. 


तांब्याच्या तारा बांधणे हे अनैसर्गिक आहे. या तांब्याच्या तारांमुळं त्यांना मूत्रविसर्जनासाठीदेखील त्रास होत होता. हे कशासाठी व का करण्यात आलं हे मात्र कळलं नाही. सांगलीत या आधीही असा प्रकार घडला होता. घोडे घरात पाळायचे नसल्यास  किंवा त्यांना पाळण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात अशावेळी ते घोड्यांना बाहेर ठेवतात. अशा वेळी त्यांची गर्भधारणा न होण्यासाठी ते अशा पद्धतीचा आघोरी उपाय करत असतील. मात्र हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाई केलीच पाहिजे, असं डॉ. चित्तोरा यांनी म्हटलं आहे.